आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत.सदर अनूदिनी मध्ये आपल्याला सेट,नेट विविध स्पर्धापरीक्षा,पदवी,पदव्युत्तर,पीएचडी याकरिता व्यावसाईक समाजकार्य संदर्भात उपयुक्त अशी माहिती मिळेल

Thursday, April 19, 2018

धनुर्वात...

धनु म्हणजे धनुष्य आणि धनुर्वात म्हणजे आकडीमध्ये धनुष्यासारखा बाक येणे. हा आजार विशिष्ट जीवाणूंमुळे होतो. या जीवाणूंच्या विषामुळे चेतासंस्थेवर परिणाम होऊन झटके येतात. लसटोचणीचा प्रसार व्हायच्या आधी या रोगाने असंख्य बळी जात. यात अगदी नवजात बालकापासून प्रौढांपर्यंत सर्वांना धोका होता. आता मात्र प्रतिबंधक लसटोचणीच्या प्रसारामुळे धनुर्वाताचे प्रमाण नगण्य झाले आहे. रोग कसा होतो धनुर्वाताचे जीवाणू मातीमध्ये सगळीकडे असतात. प्राण्यांच्या व मनुष्याच्या विष्ठेमधून ते मातीत येतात. (म्हणूनच कापलेल्या नाळेवर शेण लावणे चूक आहे.) हे जंतू अन्न पाण्याबरोबर पोटात गेले तर काही होत नाही, पण जखमेत गेल्यास धनुर्वात होऊ शकतो. जखमांमध्ये धनुर्वाताचे जंतू मिसळण्याचा धोका नेहमीच असतो. पण प्रत्येक जखमेतून धनुर्वात होतोच असे नाही. त्या व्यक्तीमध्ये विशिष्ट प्रतिकारशक्ती नसेल आणि जखमेत पू तयार करणारे जंतू असतील तर मात्र धनुर्वात होण्याची शक्यता असते. जखमेतले 'पू'जनक जंतू जखमेतला प्राणवायू वापरतात. अशा प्राणवायूविरहित जखमेत धनुर्वात जंतू वेगाने वाढतात आणि धनुर्वाताचे विष निर्माण करतात. हे विष रक्तात मिसळून चेतासंस्थेपर्यंत जाते. त्यामुळे स्नायुगटांना झटके येतात. यालाच आपण धनुर्वात म्हणतो. धनुर्वाताची जखम कोठल्याही प्रकारची असू शकते. अगदी वर्ष सहा महिन्यापूर्वी मोडलेला ते रस्त्यावरच्या वाहन अपघातापर्यंतची कोठलीही जखम धनुर्वाताला निमित्त होऊ शकते. लक्षणे व चिन्हेधनुर्वाताची सुरुवात बहुधा जखमेच्या भागातील स्नायू जडावण्यापासून होते. त्यानंतर जबडा जड होणे, दातखीळ बसणे, इतर स्नायूंमध्ये जडपणा, झटके पसरणे,श्वसनाचे स्नायू आखडून श्वसन बंद पडणे, इत्यादी परिणाम होतात. यामुळे मृत्यूही येऊ शकतो. नवजात अर्भकास धनुर्वात झाल्यास मूल विचित्र हसल्यासारखे दिसते. (चेह-याचे स्नायू आखडल्याने), मूल अंगावरचे दूध ओढत नाही, झटके येतात, श्वसन थांबते व मृत्यूही येतो. हा धनुर्वात दूषित नाळेमुळे होतो. उपचार ताबडतोब रुग्णालयात न्या. रुग्णालयात पेनिसिलीन, धनुर्वातविरोधी औषधे, झटके थांबवणारी औषधे व प्राणवायू, इत्यादी उपचार करतात. योग्य उपचाराने रुग्ण वाचू शकतो. प्रतिबंधक उपाय प्रत्येक जखम स्वच्छ ठेवा, दूषित जखम रोज हैड्रोजन द्रावाने धुवून घ्या. प्रत्येक गरोदर स्त्रीस प्रतिबंधक टी.टी. लसीचे दोन डोस मिळाले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीस टी.टी.चे दोन डोस व दर पाच वर्षानी एक बूस्टर डोस द्या. जखमेच्या वेळी टी.टी. दिले तरी त्याचा उपयोग महिन्याभरानेच होतो; लगेच नाही.

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

आरोग्य विमा...

आजच्या धावत्या जगात गतिशील राहताना एक अनोळखी भिती सतत मानवाच्या मनात घर करुन असते. कुठल्यातरी गोष्टीची धास्ती असते. मानवाचे आयुष्य दुबळे होत चालले आहे. अशा परिस्थितीतच मानव स्वतःचा बचाव करण्याचा, परिस्थितीतून मार्ग काढण्याचा सतत प्रयत्न करत असतो. पण काही वेळा तो ती परिस्थिती आवाक्यात आणण्यास असमर्थ ठरतो. याच भितीमुळे व धास्तीमुळे वीमा कंपन्यांना आज जगातील सर्वात मोठी व यशस्वी उद्योजकांपैकी एक मानले जाते.

वीमा एक असा प्रयत्न असतो की ज्याद्वारे प्रतिकुल परिस्थितीचे पूर्वानुमान लावले जाते व त्यावर मात करण्यासाठी आधीच उपाययोजना करण्या संबंधी तडजोड केली जाते. जगभरात वीम्याचे विविध प्रकार आढळतात. ते जगातील प्रत्येकासाठी उपलब्धही असतात. भारतात विशेषतः वीम्याचे दोन विभागात वर्गीकरण होते. जसे साधारण वीमा आणि आयुर्वीमा.

आयुर्वीमा म्हणजे काय?
आपल्या आयुष्यात भविष्यात घडण्या-या प्रतिकुल घटना किंवा संकटे थांबवणे आपल्या नियंत्रणात कधीच नसते. अशा घटना किंवा येणा-या परिस्थितीचा अनुमान बांधून आपण आपल्या आयुष्याचे महत्व जाणून वीमा करून घेतल्याने निधनानंतर वीम्याची रक्कम वीमा कंपनीद्वारे नोंद केलेल्या वारसदाराला मिळते. हे वारसदार पत्नी, मुले, पालक यांसारखे कोणीही असू शकते.

साधारण वीमा म्हणजे काय?
साधारण वीमामधे आयुर्वीमाप्रमाणे परतफेड होत नाही पण त्याद्वारे आपत्तीपासून किंवा अशा गरजेच्या क्षणी आपले संरक्षण करता येत असते. साधारण वीमा विविध परिस्थितीत उपयुक्त ठरू शकते जसे आजारीपण, अपघात, नैसर्गीक आपत्ती, चोरी इत्यादी. वीम्याच्या या प्रकारात अनेक उपशाखा असतात. जसे प्रवासी वीमा, घराचा वीमा, दुकानदारी वीमा, वैयक्तिक अपघात वीमा इत्यादी.

आरोग्य वीमाद्वारे आपणास अपघातासारख्या प्रसंगांसाठी वैद्यकीय चिकित्सेसाठी लागणा-या खर्चासाठी आर्थिक पाठिंबा मिळतो. आजच्या धावत्या जगासाठी हे अत्यंत महत्वपूर्ण आर्थिक उत्पादन आहे. याच्या मदतीने आपणास प्रसंगी हवे असलेले योग्य उपचार आर्थिक दृष्टिकोनाने काळजी न करता घेता येतात.

आरोग्य वीम्याचे कार्य कश्याप्रकारे चालते?
आरोग्य वीम्याचे तंत्र व प्रक्रिया अगदी सोप्या असतात. आपण या वीमा नितीनुसार आपण भरलेली रक्कम ही आपल्यास आजारात किंवा अपघातात वैद्यकीय किंवा औषधांचा खर्च परत मिळवण्यासाठी भरत असतो. तसेच ह्या नितीतंत्रात रुग्णालयात दाखल करण्यापासून, डॉक्टरांची आकारणी, औषधे व इतर सेवा खर्चाचा समावेश असतो. सहसा आरोग्य वीमा नितीमध्ये रोजच्या म्हणजेच नित्यनेमाची औषधे किंवा नित्यनेमाचे वैद्यकीय उपचार यासाठी लागू होत नाही.

आपण आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य वीमा निती विकत घेऊ शकतो. आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी आपणास त्याचा वार्षिक हप्ता किंवा आकारणी विमा कंपनीला भरावी लागते. आपण आपल्या वीमाची रक्कम ठरवू शकतो व वार्षिक आकारणी भरु शकतो.

जर आपण आजारी पडलो तर वीमा कंपनीचे हे कर्तव्यच असते की आपल्या विम्याची रक्कम परतफेड केली जावी. ही परतफेड एक रकमी किंवा आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या हाप्त्यात असू शकते. उदाहरणार्थ, जर आपल्याकडे एक लाख रुपयांची वीमानिती असेल, आपण आजारी पडलेलो असलो तर आपणास विमा कंपनीकडून एक लाखापर्यंत परतफेड मिळू शकते. जर आपणा अशा वेळेस कमी आवशक्ता असेल तर वेमा कंपनी आपणास गरजेनुसार हप्त्यात रक्कम देते.

ही देयक रक्कम आपणास वीमा कंपनीकडून दोन मार्गाने मिळू शकते. ते पुन्हा आपल्या वीमानितीच्या प्रकारावर अवलंबून असते. आपण आजारी पडल्यानंतर किंवा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर आपण रुग्णालयास देयक भरल्यानंतर वीमा कंपनीकडे उपचारानंतर परतफेडीसाठी दावा करु शकतो. दुस-या प्रकारात आपल्या समस्यांच्या प्रसंगी वेमा कंपनीच्या नितीनियमांनुसार उपचारासाठी ठरलेल्या रुग्णालयात दाखल केल्यास रुग्णाची बिले म्हणजेच देयक रक्कम वीमा कंपनी व रुग्णालय यांच्यातच थेट व्यवहारीत राहते.

आपल्या आयुष्यात कोणताही अडथळा न येता आपले आयुष्य सुरळीत राहो हा सकारात्मक दृष्टिकोन असतो पण दुरदृष्टी ठेऊन केलेल्या या नियोजनामुळे आपण भविष्यातील नकारात्मक शक्यतांना काही प्रमाणात मात करु शकतो. म्हणूनच आपला व आपल्या कुटुंबियांचा वीमा करुनच घ्यावा.

प्रतिबंधात्मक औषधे...

प्रतिबंधात्मक औषधे...

औषधांचे वर्गीकरण:
औषधांचे वर्गीकरण करण्याच्या अनेक तर्‍हा आहेत: त्यांच्या रासायनिक गुणधर्मानुसार , औषध घेण्याच्या वहनमार्गानुसार, औषधाचा प्रभाव दिसणाऱ्या शरीरसंस्थेनुसार, औषधयोजनेचे परिणाम इत्यादी अनेकविध तर्‍हांनी औषधांची वर्गवारी करता येऊ शकते.

औषध घेण्याच्या वहनमार्गानुसार वर्गीकरण :

औषधांचे ती घेण्याच्या वहनमार्गानुसार अनेक प्रकार आहेत.

अ. तोंडावाटे घेण्याची औषधे : सगळ्यात जास्त वापरला जाणारा हा प्रकार आहे. हा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. परंतु काही वेळा ; जसे रोगी शुद्धीवर नसल्यास, त्याला जुलाब होत असतील तर किंवा औषध पोटातील आम्लामध्ये विघटीत होत असेल तर हा मार्ग वापरता येत नाही.औषधाची गोळी ही गोल, लंबगोल, चौकोनी अशा वेगवेगळ्या आकारांत आणि रंगांमध्ये उपलब्ध असते. ही सहसा पाण्याबरोबर गिळली जाते. परंतु, चघळण्याची , आधी विरघळवून घ्यायची असेही प्रकार आहेत.

ब. डोळ्यावाटे घेण्याची औषधे: सहसा डोळ्याच्याच विकारांसाठी असतात व त्यातील बव्हंश औषधांमध्ये निर्जंतुकीकरण करणारे औषधही असते.

क.शीरेवाटे घेण्याची औषधे:

ड.त्वचेला लावण्याची औषधे

इ . श्वसनमार्गे घेण्याची औषधे

ई. नाकावाटे घेण्याची औषधे

उ . कानावाटे घेण्याची औषधे

ऊ. गुदद्वारामार्गे आणि योनीमार्गे घेण्याची औषधे

औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी त्याचा नियंत्रित वापर होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी योग्य औषधे, योग्य रुग्णास, योग्य मात्रेत दिल्यानंतर ती योग्य मार्गाने, योग्य कालावधीसाठी वापरणे अपेक्षित असते.

ग्राम स्वच्छता अभियान...

ग्राम स्वच्छता अभियान
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

कुटूंब कल्‍याण कार्यक्रम...

पार्श्वभूमी-
केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्‍ट्रात लोकसंख्‍या वाढीच्‍या नियंञणासाठी राष्‍ट्रीय कुटूंब कल्‍याण कार्यक्रम राबविला जातो. सहाय्यक अनुदान योजना ही सदर कुटूंब कल्‍याण कार्यक्रमाचाच एक भाग असून ती योजना सन १९६० मध्‍ये सुरु झालेली आहे.

सदर योजना १०० टक्‍के केंद्र पुरस्‍कृत आहे.

उद्दिष्ट-
लोकसंख्‍या वाढीवर नियंञण व लोकसंख्‍या स्थिरतेस सहाय्य करणे

अंमलबजावणी पद्धती
केंद्र शासनाच्‍या पुढे दिलेल्‍या मार्गदर्शक तत्‍वानुसार योजनांची अंमलबजावणी करण्‍यांत येते.

लाभार्थीने स्‍वेच्‍छेने कुटूंब नियोजन पध्‍दत स्विकारणे
समाजाच्‍या गरजेनुसार सेवा देणे.
जोडप्‍याला त्‍यांच्‍या इच्‍छेनुसार हवी तेव्‍हा अपत्‍य प्राप्‍ती.
आरोग्‍य कर्मचा-यामार्फत लाभार्थ्‍यांचे संतती नियमनाच्‍या उपलब्‍ध पध्‍दतीविषयी समुपदेशन केले जाते. त्‍यानुसार लाभार्थी उपलब्‍ध पध्‍दतीमधून योग्‍य पध्‍दतीची निवड करतो. सध्‍या केंद्र शासन प्रसूती पश्‍चात कुटूंब नियोजन सेवांवर अत्‍याधिक भर देत आहे.

कुटूंब कल्‍याण कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्‍यांना दयावयाच्‍या सेवांमध्‍ये कायमच्‍या पध्‍दती व तात्‍पुरती पध्‍दती असे दोन प्रकार आहेत. कायमच्‍या पध्‍दतीमध्‍ये पुरुष शस्त्रक्रिया व स्‍त्री शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो. स्‍त्री शस्त्रक्रियांमध्‍ये टाक्‍याच्‍या व बिनटाक्‍याच्‍या शस्त्रक्रिया केल्‍या जातात. तात्‍पुरत्‍या पध्‍दतीमध्‍ये तांबी, गर्भनिरोधक गोळया व निरोध यांचा वापर केला जातो.

लोकसंख्‍या वाढीवर नियंत्रण आणण्‍यासाठी राज्‍यात कुटूंब कल्‍याण कार्यक्रम राबविण्‍यात येतो. यासाठी राज्‍याने दि. ९ मे २००० च्‍या शासन निर्णयानुसार ‘छोटे कुटूंब’ या संकल्‍पनेचा स्विकार केलेला आहे. ‘छोटे कुटूंब’ म्‍हणजे दोन अपत्‍यांपर्यंतचे कुटूंब.

कार्यपद्धती-
राष्‍ट्रीय कुटूंब कल्‍याण कार्यक्रमांतर्गत राज्‍यात नागरी आरोग्‍य केंद्रे, नागरी कुटूंब कल्‍याण केंद्रे, सहायक परिचारीका प्रसाविका प्रशिक्षण केंद्रे या योजना सुरु करण्‍यात आलेल्‍या आहेत. या संस्‍था महानगरपालिका व नगरपालिका कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. हा कार्यक्रम राबविण्‍यासाठी स्‍थानिक व स्‍वयंसेवी संस्‍थांचा सहभाग घेण्‍यात येतो. स्‍थानिक व स्‍वयंसेवी संस्‍था राष्‍ट्रीय कुटूंब कल्‍याण कार्यक्रमामध्‍ये स्‍वेच्‍छेने सहभागी झालेल्‍या आहेत. केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध योजनेअंतर्गत या संस्‍थांना आर्थिक सहाय्य, सहाय्यक अनुदानाच्‍या स्‍वरुपात दिले जाते.

या कार्यक्रमामध्‍ये प्रत्‍येक नागरी आरोग्‍य केंद्र व नागरी कुटूंब कल्‍याण केंद्र यांना लोकसंख्‍येचे कार्यक्षेत्र ठरवून दिले जाते मात्र नागरी आरोग्‍य सुविधा योजनाअंतर्गत मंजूर केलेल्‍या केंद्रास त्‍यांच्‍या लोकसंख्‍येपैकी ४० टक्‍के लोकसंख्‍या झोपडपट़टी अथवा तत्‍सम भागातील असणे आवश्‍यक असते. या कार्यक्षेत्रातील लोकांना कुटूंब कल्‍याण कार्यक्रम सेवा तेथील अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत दिली जाते.

या केंद्रामार्फत मुखावाटे घ्‍यावयाच्‍या गर्भनिरोधक गोळया व निरोध यांचे वाटप करण्‍यांत येते. तांबी बसविण्‍याची सुविधाही या केंद्रातर्फे पुरविण्‍यांत येते. कांही संस्‍थांद्वारे कुटूंब नियोजन शस्‍त्रक्रिया ही सेवा दिली जाते.

देण्यात येणा-या सेवा-
या केंद्रामार्फत तोंडवाटे द्यावयाच्या गर्भनिरोधक गोळया व निरोध यांचे वाटप करण्यात येते. तांबी बसविण्याची सुविधाही या केंद्रातर्फे पुरविण्यात येते. कांही संस्थांद्वारे कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया ही सेवा दिली जाते.

कार्यक्रम व योजनांची वैशिष्टे-
लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात कुटूंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात येतो. यासाठी राज्याने दि. ९ मे २००० च्या शासन निर्णयानुसार ‘छोटे कुटूंब’ या संकल्पनेचा स्विकार केलेला आहे. ‘छोटे कुटूंब’ म्हणजे दोन आपत्यापर्यंतचे कुटूंब

सेवा केंद्रे-
राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमांतर्गत राज्यात नागरी आरोग्य केंद्रे, नागरी कुटूंब कल्याण केंद्रे, सहाय्यक परिचारीका प्रसाविका प्रशिक्षण केंद्रे या योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. या संस्था संस्था महानगरपालिका व नगरपालिका कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. हा कार्यक्रम राबविण्यासाठी स्थानिक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्यात येतो. स्थानिक व स्वयंसेवी संस्था या राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमामध्ये स्वेच्छेने सहभागी झालेल्या आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध योजनेअंतर्गत या संस्थांना आर्थिक सहाय्य, सहाय्यक अनुदानाच्या स्वरुपात दिले जाते.

अशासकिय स्वयंसेवी संस्थांची भुमिका-
हा कार्यक्रम राबविण्यासाठी स्थानिक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्यात येतो. स्थानिक व स्वयंसेवी संस्था राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये स्वेच्छेने सहभागी झालेल्या आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध योजनेअंतर्गत या संस्थांना आर्थिक सहाय्य, सहाय्यक अनुदानाच्या स्वरुपात दिले जाते.

परिणाम-
राज्‍याने एकूण निव्‍वळ प्रजनन दर १.८ इतका साध्‍य केलेला आहे.

Sexually Transmitted Diseases (STD)- समागमाव्दारे पसरणारा रोग

१.परमा (गोनो-हीआ) म्हणजे काय ?
परमा हा एक समागमाव्दारे पसरणारा रोग (एसटीडी) आहे.  हा रोग निस्सेरीया गोनो-हीई या विषाणूमुळे होतो. हा विषाणू, स्त्रिया आणि पुरुषांच्या पुनरुत्पादक मार्गातील ओलसर भागात वाढतो आणि सहज व्दीगुणीत होतो.  हा विषाणू, तोंड, घसा, डोळे आणि गुदव्दारातही वाढतो.

लोकांना परमा कसा होतो ?
परमा हा शिश्न, स्त्रीयोनी, तोंड किंवा गुदव्दाराशी संपर्क होण्याव्दारे पसरतो.  प्रसुतीदरम्यान हा रोग मातेकडून बाळालाही होऊ शकतो.

परमाची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?
लैंगिकदृष्ट्या कोणत्याही क्रियाशील व्यक्तीला परमा होऊ शकतो.  अर्थात परमा झालेल्या अनेक पुरुषांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, काही पुरुषांना संक्रमणानंतर दोन ते पाच दिवसांनी काही चिन्हे किंवा लक्षणे दिसून येतात, ही लक्षणे दिसून येण्यास जास्तीत जास्त तीस दिवस लागू शकतात.  या चिन्हें आणि लक्षणांमधे लघवी करताना जळजळणे, किंवा शिश्नातून पांढरा, पिवळा, किंवा हिरवा स्त्राव होतो.  काहीवेळा परमा झालेल्या पुरुषांना वृषणात वेदना होते किंवा ते सुजतात.

महिलांमधे, परमाची लक्षणे ब-याचदा सौम्य असतात.  महिलांमधील प्रारंभिक लक्षणे आणि चिन्हे यामधे, लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे, योनीव्दारे अधिक स्त्राव होणे, किंवा दोन पाळींच्या दरम्यान योनीतून रक्तस्त्राव होणे यांचा समावेश असतो.

एखादी गर्भवती महिला आणि तिचे बाळ यांना परमा कशाप्रकारे प्रभावित करतो?
एखाद्या गर्भवती महिलेला परमा असेल तर, प्रसुतीदरम्यान ते योनी मार्गातून बाहेर येत असताना ती त्याला हे संक्रमण प्रसारीत करु शकते.  त्यामुळे अंधत्व, सांध्यांमधे संक्रमण किंवा जीवाला घातक असे रक्ताचे संक्रमण बाळाला होऊ शकते.  गर्भवती महिलेला परमाचे निदान झाल्यानंतर लगेचच त्यावर उपचार केल्यास या समस्या टाळता येऊ शकतात.  गर्भवती महिलांनी आवश्यकतेनुसार योग्य ती तपासणी, चाचणी आणि उपचारांसाठी आरोग्य निगा कार्यकर्त्याचा सल्ला घ्यावा.

परमा कसा टाळता येईल ?
समागमाव्दारे संप्रेषित होणारे रोग टाळण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे लैंगिक संबंधापासून दूर राहणे, किंवा अशा जोडीदारासोबत दीर्घकालीन एकनिष्ठ संबंध ठेवावेत ज्याची तपासणी करण्यात आली आहे आणि त्याला कोणताही संसर्ग नाही याची खात्री आहे.

२.गुप्तांगाजवळील नागीण म्हणजे काय ?

 गुप्तांगाची नागीण हा समागमाव्दारे पसरणारा रोग (एसटीडी) असून तो प्रकार 1 आणि प्रकार 2 च्या हार्पिस सिम्प्लेक्स व्हायरसेस (एचएसव्ही-1) आणि एचएसव्ही-2 मुळे होतो.

लोकांना गुप्तांगाची नागीण कशी होते

सामान्यतः एखाद्या व्यक्तीला, गुप्तांगाचे एचएसव्ही – 2 चे संक्रमण असलेल्या व्यक्तीकडून समागमाच्या दरम्यानच एचएसव्ही-2 चे संक्रमण होते.  ज्या जोडीदाराला न दिसणारा फोड आहे आणि आपण संक्रमित आहोत किंवा नाही याची माहिती नसेल अशा जोडीदाराकडून संक्रमण होऊ शकते.

गुप्तांगाच्या नागिणीची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?

एचएसव्ही-2 चे संक्रमण झालेल्या बहुतांश लोकांना आपल्याला संक्रमण झाले आहे याची माहिती नसते.  विषाणूचे संक्रमण झाल्यानंतर त्याचा पहिला उद्रेक हा सामान्यतः दोन आठवड्यांच्या आत होतो, आणि त्याचे फोड हे दोन ते चार आठवड्यांच्या आत बरे होतात. 

जेव्हा चिन्हे दिसतात, तेव्हा ती गुप्तांग किंवा गुदव्दाराच्या वर किंवा आसपास एक किंवा अधिक फोडांच्या स्वरुपात दिसतात.  हे फोड फुटतात, आणि तिथे नाजुक चट्टे तयार होतात जे पहिल्यावेळी बरे होण्यास दोन किंवा चार आठवडे घेतात.  दुसरा उद्रेक हा पहिल्यानंतर अनेक आठवडे किंवा महिन्यानी होतो, तो पहिल्यापेक्षा कमी तीव्रतेचा आणि कमी कालावधीचा असतो.  हे संक्रमण शरीरात अमर्याद काळापर्यंत राहू शकत असले तरी, काही वर्षांच्या काळात त्याचे उद्रेक हे कमी होऊ लागतात.  अन्य चिन्हे आणि लक्षणांमधे फ्लूसारखी लक्षणे, ताप आणि सुजलेल्या ग्रंथींसह दिसून येतात.

नागिणीवर काही उपचार आहेत काय ?

नागीण बरी करु शकतील असे उपचार नाहीत, परंतु विषाणूविरोधी औषधे रोगी जोवर घेत राहील तोवर उद्रेक कमी करता येतात किंवा टाळले जातात.  त्याशिवाय, लक्षणांवर आधारित नागिणीसाठी दैनंदिन प्रतिबंधात्मक उपचार केल्याने ती जोडीदाराला होण्याची शक्यता कमी करता येते.

नागीण कशी टाळता येईल ?

समागमाव्दारे संप्रेषित होणारे रोग टाळण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे लैंगिक संबंधापासून दूर राहणे, किंवा अशा जोडीदारासोबत दीर्घकालीन एकनिष्ठ संबंध ठेवावेत ज्याची तपासणी करण्यात आली आहे आणि त्याला कोणताही संसर्ग नाही याची खात्री आहे.

३.पीआयडी म्हणजे काय ?
कटीभागाचा दाहरोग (पीआयडी) हा एक सर्वसाधारण शब्दप्रयोग आहे जो गर्भाशय, फॅलोपिन ट्यूब (डिंबग्रंथींमधून गर्भाशयात अंडी वाहून नेणारी नळी) आणि इतर पुनरुत्पादक अवयवांच्या संक्रमणाशी निगडीत आहे.

महिलांना पीआयडी कसा होतो ?
विषाणू हा एखाद्या महिलेच्या योनी किंवा गर्भाशयाच्या मुखातून वर सरकतो आणि तिच्या पुनरुत्पादक अवयवात शिरतो.  विविध प्रकारचे विषाणू पीआयडीला कारणीभूत ठरतात, परंतु अनेक प्रकरणी ते परमा आणि क्लॅमिडीयाशी संबंधित असतात, हे दोन सर्वात सामान्य विषाणूजन्य एसटीडी आहेत.  लैंगिकदृष्ट्या क्रियाशील महिलांना त्यांच्या गर्भधारणाक्षम वर्षांमधे सर्वाधिक धोका असतो, आणि पंचवीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना त्यांच्यापेक्षा अधिक वयाच्या महिलांच्या तुलनेत पीआयडी विकसित होण्याची अधिक शक्यता असते.  याचं कारण असं की अल्पवयीन मुली आणि य़ुवतींचे गर्भाशय पूर्णतः विकसित झालेले नसते. त्यामुळे पीआयडीशी निगडीत असलेले एसटीडी त्यांना होण्याची शक्यता बळावते.

पीआयडीची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?
पीआयडीची लक्षणे अजिबात नसण्यापासून तीव्र असण्यापर्यंत वेगवेगळी असू शकतात.  ज्यावेळी पीआयडी हा क्लॅमिडीयल संक्रमणामुळे होतो तेव्हा त्या महिलेला, तिच्या पुनरुत्पादक अवयवांना गंभीर स्वरुपाचे नुकसान पोचत असताना हलकी लक्षणे दिसतात किंवा अजिबात दिसत नाहीत. ज्या महिलांना पीआयडीची लक्षणे दिसतात त्यांना साधारणतः ओटीपोटात वेदना होते.  अन्य चिन्हे आणि लक्षणांमधे ताप, अधिक प्रमाणात योनीतून दुर्गंधीयुक्त रक्तस्त्राव, वेदनादायक समागम, लघवी करताना दुखणे आणि पाळीचा रक्तस्त्राव अनियमित होणे यांचा समावेश होतो.

पीआय़डी कसा टाळता येईल ?
समागमाव्दारे संप्रेषित होणारे रोग टाळण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे लैंगिक संबंधापासून दूर राहणे, किंवा ज्याची तपासणी करण्यात आली आहे आणि त्याला कोणताही संसर्ग नसल्याची खात्री आहे अशा जोडीदारासोबत दीर्घकालीन एकनिष्ठ संबंध ठेवावे.

४.गरमी (सिफिलिस):-

हा आजार फार पूर्वी पोर्तूगीज खलाशांनी आपल्या देशात आणला. यामुळे याला फिरंगी रोग असे नाव होते. सामान्य लोक भाषेत याला गरमी (उष्णता) असे नाव आहे. हा आजार वैद्यकीय विश्वात एक धोकादायक लपाछपीचा आजार म्हणून माहीत आहे. कारण हा निरनिराळया स्वरुपात उमटतो आणि नाहीसा होतो. परत येतो परत दिसेनासा होतो. पण शरीराच्या आत याचे दुष्परिणाम चालूच असतात. रोगजंतुविरोधी औषधांनी हा आजार खूप कमी झाला होता. पण एड्स आजाराबरोबर त्याचे परत आगमन झाले आहे. या आजाराचे मुख्य प्राथमिक स्वरुप जननेंद्रियावर व्रण (अल्सर) आणि अवधाण असे आहे.

हा आजार स्प्रिंगसारख्या विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंमुळे होणारा आजार आहे. जंतुदूषित व्यक्तींशी केलेल्या लैंगिक संबंधानंतर सुमारे 10-90 दिवसांत कधीही याची लक्षणे दिसतात. ह्या रोगाची पुळी पुरुषांच्या शिश्नावर किंवा त्यावरच्या त्वचेखाली येते. स्त्रियांमध्ये ही पुळी योनिमार्गात किंवा गर्भाशयाच्या तोंडावर उठते. ही पुळी फुटून त्या जागी व्रण तयार होतो. हा व्रण 1-2 से.मी.व्यासाचा, न दुखणारा, बुडाशी जाडसर व निबर असतो.

हा व्रण आल्यानंतर एका आठवडयात एका किंवा दोन्ही बाजूंच्या जांघेत अवधाण येते. या गाठी न दुखणा-या आणि रबरासारख्या सटकणा-या असतात. हळूहळू त्या एकमेकांत गुंतून एकच मोठी गाठ तयार होते.

जननेंद्रियावरील व्रण उपचाराशिवायही 1-2 महिन्यांत नाहीसा होतो. परंतु गरमी (सिफिलिस) रोग आत वाढतच राहतो. हा व्रण हाताने चाचपून तपासताना फार काळजी घेणे आवश्यक आहे. (यासाठी रबरी मोजे वापरावे लागतात) स्पर्श झाल्यास डेटॉलने हात न धुतल्यास तपासणा-यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.

या आजारात वेळीच उपचार न झाल्यास यानंतर अंगावर न खाजणारे चट्टे येणे,तोंडात व्रण तयार होणे, शरीरात ठिकठिकाणी अवधाण येणे, इत्यादी त्रास सुरू होतो. गुदद्वाराच्या बाजूलाही व्रण उठतात. ही लक्षणे प्राथमिक आजार बरा झाल्यावर 1-3महिन्यात उमटतात आणि 1-3 महिन्यांत बरी होतात.

यानंतर काही महिने काहीच होत नाही. यापुढे रोग शरीरावर न दिसता आत पसरतो. काही वर्षानंतर या आजाराचे हृदय, मेंदू, हाडे यांवर दुष्परिणाम दिसतात. हाडांमध्ये या रोगाचे व्रण किंवा गाठी तयार होतात. हृदयाच्या झडपा निकामी होणे, महारोहिणीला फुगार येऊन ती कमकुवत होणे, मेंदू व चेतासंस्था निकामी होत जाणे, इत्यादी दूरगामी परिणाम होतात.

आईस या रोगाची बाधा झाली असेल तर गर्भावर वाईट परिणाम होतात. चवथ्या-पाचव्या महिन्यात गर्भपात, वारंवार गर्भपात, उपजत मृत्यू, मूल जगल्यास त्याला जन्मजात व्यंगे (विकृत हाडे, यकृत सूज, अंगावर चट्टे, इ.) असू शकतात.

यावरून सिफिलिस हा एक अत्यंत गंभीर रोग आहे हे स्पष्ट होईल. मात्र वेळीच पुरेसा उपचार झाल्यास हा पूर्णपणे बरा होऊ शकतो व पुढचे नुकसान टळू शकते.

रोगनिदान
जननसंस्थेच्या तपासणीत न दुखणारा व्रण असणे, जांघेत गाठी येणे यावरून प्राथमिक सिफिलिसचे निदान सोपे असते. मात्र नंतरच्या अवस्थेत तो ओळखणे अवघड असते. स्त्रियांमध्ये व्रण आलाच तर तो अंतर्भागात असल्याने सहसा लक्षात येत नाही.

वारंवार गर्भपात होणे, उपजत मृत्यू, बाळास जन्मजात व्यंगे इत्यादींवरून स्त्रियांमध्ये या आजाराची शंका घ्यायला पाहिजे.

गरोदरपणाच्या तपासणीत यासाठी रक्ततपासणी केली जाते.

रोगनिदान करतानाही रक्ततपासणी करतात. पती आणि पत्नी दोघांचीही तपासणी आवश्यक असते. उपचारही दोघांवर करावे लागतात.

या आजाराच्या निदानासाठी व्रणाच्या द्रवाच्या सूक्ष्मदर्शक तपासणीत जंतू चटकन ओळखू येतात. पण रक्तावर व्ही.डी.आर.एल. तपासणी ही जास्त प्रचलित आहे. लागण झाल्यावर महिन्याभरात ही तपासणी उपयुक्त ठरते. याचबरोबर एचायव्ही-एड्ससाठी एलायझा तपासणी करावी. हे दोन्ही आजार एकत्र येऊ शकतात. दोन्ही आजार एकत्र असतील तर उपचारांमध्ये अर्थातच बदल करावा लागतो.

उपचार
सिफिलिसचे उपचार डॉक्टरच करतील. परंतु आपल्याला त्याची काही माहिती असणे आवश्यक आहे. पेनिसिलीनची इंजेक्शने 10-15 दिवस रोज (किंवा एकाच दिवशी मोठा डोस) याप्रमाणे दिली जातात. पेनिसिलीन उपचार काही कारणाने शक्य नसल्यास डॉक्सीच्या गोळया रोज 2 याप्रमाणे 15 दिवस घेतल्यास उपयोग होतो. याशिवाय इतरही अनेक औषधे लागू पडतात. पण डॉक्टरशिवाय कोणीही याचा उपचार करू नये. या आजारात पुष्कळ गुंतागुंत असते. अर्धवट उपचार झाले तर रोग शिल्लक राहतो व दुष्परिणाम टळू शकत नाहीत. उपचार योग्य झाले तर व्रण लगेच बरा होतो. पण व्रण सहा ते आठ आठवडयांत आपोआपही जाऊ शकतो. यामुळे रुग्णाचा गैरसमज होतो. ब-याच रुग्णांना योग्य उपचार मिळू शकत नाहीत आणि रोग आत वाढत राहतो.

आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पती-पत्नीपैकी कोणालाही आजार असला तरी उपचार दोघांनाही होणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्तीपासून आजार आला असेल त्या व्यक्तीसही उपचार होणे आवश्यक असते.(उदा. वेश्या) व्यवहारात मात्र हे फारसे पाळले जात नाही. त्यामुळे हा रोग पसरत राहतो.

रोगनिदानात या आजारांपैकी दुसरा प्रकार जरी दिसत असला तरी यासोबत गरमी आहे किंवा नाही याची पक्की खात्री करणे आवश्यक असते. कारण एकाच वेळी अनेक प्रकारचे लिंगसांसर्गिक आजार होणे अगदी शक्य आहे. 'गरमी' रोगनिदानातून सुटणे योग्य नाही. त्यासाठी रक्ततपासणी आवश्यक ठरते.

५.क्लॅमिडीया म्हणजे काय ?
क्लॅमिडीया हा समागमाव्दारे पसरणारा व नेहमी आढळणारा रोग असून तो क्लॅमिडीया ट्रॅकोमॅटीस या विषाणूमुळे होतो. हा विषाणू एखाद्या महिलेच्या पुनरुत्पादक अवयवांना नुकसान पोचवू शकतो.

लोकांना क्लॅमिडीया कसा होतो
क्लॅमिडीया हा योनीव्दारे, गुदव्दारामार्गे किंवा तोंडावाटे समागम करण्यातून पसरतो.  योनीमार्गे प्रसूतीदरम्यान एखाद्या संसर्गग्रस्त मातेकडून तिच्या बाळालाही संप्रेषित होऊ शकतो.  लैंगिकदृष्ट्या क्रियाशील कोणत्याही व्यक्तीला क्लॅमिडीया होऊ शकतो.

क्लॅमिडीयाची लक्षणे कोणती आहेत ?
स्त्रियांमधे हा विषाणू प्रारंभी गर्भाशय आणि मूत्रमार्गावर परिणाम करतो.  ज्या महिलांमध्ये याची लक्षणे दिसतात त्यांना असामान्य प्रमाणात योनीस्त्राव किंवा लघवी करतेवेळी जळजळ होऊ शकते.  जेव्हा हा संसर्ग गर्भाशयाकडून अंडनलिकांमधे पसरतो, तेव्हासुध्दा काही महिलांना लक्षणे किंवा चिन्हे दिसत नाहीत, इतरांना ओटीपोटात दुखणे, पाठीच्या खालच्या भागात दुखणे, ताप, समागम करताना वेदना होणे, किंवा दोन पाळ्यांदरम्यान रक्तस्त्राव होणे असे त्रास होऊ शकतात.

लक्षणे असणा-या पुरुषांना त्यांच्या लिंगातून स्त्राव येणे किंवा लघवी करताना जळजळणे होऊ शकते.  पुरुषांना लिंगाच्या तोंडाजवळ जळजळ किंवा खाज होऊ शकते.

क्लॅमिडीयावर उपचार न केल्यास कोणती समस्या उद्भवू शकते ?
क्लॅमिडीयावर उपचार न केल्यास ह्या संक्रमणाचे रूपांतर गंभीर स्वरुपातील पुनरुत्पादक आणि इतर आरोग्य समस्यांमधे होऊ शकते आणि त्यांचे अल्प तसेच दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.  महिलांमधे, उपचार न केलेला संसर्ग हा गर्भाशय किंवा अंडनलिकांमधे पसरु शकतो आणि कटीभागाचा दाहरोग (पीआयडी) होऊ शकतो.  क्लॅमिडीया झालेल्या महिलांना संबंध आल्यास, एचआयव्ही होण्याची पाचपट अधिक शक्यता असते. पुरुषांमधे गुंतागुंतीची समस्या क्वचितच होते.

क्लॅमिडीया कसा टाळता येईल ?
समागमाव्दारे संप्रेषित होणारे रोग टाळण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे लैंगिक संबंधापासून दूर राहणे, किंवा ज्याची तपासणी करण्यात आली आहे आणि त्याला कोणताही संसर्ग नसल्याची खात्री आहे अशा जोडीदारासोबत दीर्घकालीन एकनिष्ठ संबंध ठेवावे.

  

>